कुठे पैसे, तर कुठे सोने चांदी; राजकीय वातावरण कमालीचे तापले !!

Foto
मुंबई : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार आहे. या मतदानाची तारीख जवळ येत असतानाच आता राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आता छुप्या पद्धतीने पैसे वाटप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध मतदारसंघांमध्ये पैसे वाटपाच्या संशयावरून मुंबई, वसई आणि डोंबिवलीत राजकीय पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या संघर्षाचे रूपांतर हाणामारी आणि थेट हत्येच्या प्रयत्नासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये झाले आहे.

जळगावात मोठी कारवाई; २९ लाख जप्त

जळगावच्या ममुराबाद नाका परिसरात निवडणूक आयोगाच्या स्थिर सर्वेक्षण पथकाने नाकेबंदी दरम्यान एका कारची झडती घेतली. या कारमध्ये तब्बल २९ लाख रुपयांची रोकड, ३ किलो चांदी आणि ८ तोळे सोने आढळून आले. कारमधील व्यक्तींनी हा मुद्देमाल बहर्‍हाणपूर येथील सराफ पेढीचे मालक दामोदरदास गोपालदास श्रॉफ यांचा असल्याचे सांगितले. मात्र, जागेवर कोणतीही अधिकृत कागदपत्रे किंवा पावत्या सादर न केल्यामुळे पोलिसांनी हा सर्व ऐवज जप्त करून सरकारी कोषागार विभागात जमा केला आहे.

पुण्यात चांदीच्या वाट्या वाटल्याचा आरोप 

पुणे : अजित पवार आणि भाजप यांच्यातील तीव्र संघर्षामुळे कमालीच्या रंगतदार झालेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मतदानापूर्वी मतदारांना पैसे वाटण्याचे प्रकार सर्रास घडतात. हे प्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहेत. मात्र, एवढा चोख बंदोबस्त असतानाही पुण्यात मतदारांना चांदीच्या वाट्या वाटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी हा आरोप केला आहे.